औरंगाबाद- वैजापूर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपीला औरंगाबाद ग्रामीण गुन्हे शाखेने २४ तासात अटक केली आहे. किशोर वायाळ असे घरफोड्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरी झालेले २४ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपी वायाळ हा जामिनावर असलेला वॉन्टेड घरफोड्या आहे. या प्रकरणातील एक आरोपी मात्र फरार झाला आहे.
वैजापूर घरफोडी प्रकरणातील आरोपी २४ तासात गजाआड किशोर वायाळ या आरोपीवर औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण, अमरावती, वाशिम, अकोला, सोलापूर, जालना, बुलडाणा जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेश मधील बऱ्हाणपूर, गुजरातमधील सुरत अशा ठिकाणी घरफोड्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
१३ जुन रोजी वैजापूर येथे राहणारे प्रकाश छाजेड बाहेर गावी गेले असता, त्यांच्या घरात चोरी झाली होती. या घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोख रक्कम असा २४ लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी एक पथक तयार करून कारवाईला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, किशोर वायाळ या जामिनावर असलेल्या घरफोड्याने घरफोडी केल्याचे समोर आले. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील सावरखेडा ते दुसरबीड रोडवर सापळा रचून किशोर वायाळला अटक केली.
आरोपीकडून पोलिसांनी २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात बुलडाणा येथील आकाश पवार हा आरोपी देखील समाविष्ट आहे. मात्र, आकाश फरार झाला आहे. किशोर वायाळकडून अन्य गुन्ह्यातील मुद्देमाल मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.