औरंगाबाद - शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाड दरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे मजूर गावी निघाले होते. रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी जात असताना प्रवासादरम्यान ते औरंगाबदजवळ बदनापूर - करमाड दरम्यान पोहोचले. रात्र झाल्याने सर्वजण तिथेच रुळावर झोपले होते; आणि झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीला रुळावर झोपलेल्या मजूरांचा अंदाज आला नाही. यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे. खरंतर, देशभरात याआधी देखील रेल्वेने चिरडण्याचे प्रकार घडले आहेत. त्याबद्दल...
अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशीच काळाचा घाला
अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी ६२ ग्रामस्थांवर काळाने घाला घातला. रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी जमाव रेल्वे रुळावर आला. संबंधित दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच जोडा या फाटक या ठिकाणी रेल्वेने ६२ जणांना चिरडले; आणि ७२ नागरिक गंभीर जखमी झाले होते.
धमरा घाट अपघात
बिहारच्या खगरिया जिल्ह्यात भरधाव एक्सप्रेसने कंवारा भाविकांना चिरडले होते. यामध्ये ३७ भाविकांचा मृत्यू झाला. धर्मा घाट स्थानकाजवळ हे भाविक ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित प्रकार घडला. याचप्रमाणे २०१८ मध्ये कैमीर जिल्ह्यात एका रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व अपघातग्रस्त रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार घडला.