औरंगाबाद - जी गोष्ट मागून मिळत नाही, ती गोष्ट आपल्याला हिसकाऊन घ्यावी लागणार आहे. आम्ही केवळ १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींच्याही वरचढ ठरू, हे लक्षात ठेवा! असे वादग्रस्त वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी केले होते. पठाण यांच्या या वक्तव्यानंतर आता चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वारिस पठाण यांच्यावर जहरी टीका केली आहे.
वारिस पठाण यांच्या 'त्या' वक्तव्याने राजकीय वातावरण तापले काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
वारीस पठाण राज्यातील वातावरण खराब करू पाहत आहे. सध्या ठाकरे सरकार आहे. गृहविभाग नक्कीच या वक्तव्याला गांभीर्याने घेईल. असे विधान थांबवले नाही तर शिवसेना देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच वारिस पठाण यांना शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन देऊन श्रद्धा आणि सबुरी शिकवली पाहिजे, असा सल्ला राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
हेही वाचा -'आम्ही १५ कोटी आहोत, मात्र १०० कोटींना वरचढ ठरू... हे लक्षात ठेवा!'
तर दुसरीकडे, भाजप नेते जेव्हा अशा प्रकारची विधाने करतात त्यावेळी प्रसारमाध्यमे हा मुद्दा का उचलत नाहीत, अशी टीका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील केली आहे. तसेच वारिस पठाण यांनी केलेल्या वातव्याबाबत त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. आमचा पक्ष कुठल्याही पद्धतीचा जातीवाद करत नाही, असेही जलील म्हणाले.