औरंगाबाद -मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्यावेळी पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेला मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिलांना अडवल्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली व महिलांनी त्यांना आपले निवेदन दिले.
मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यामुळे न्यायलयाने आरक्षणाला स्थिगिती दिली. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तातडीची पावले उचलावीत अन्यथा 22 सप्टेंबरनंतर मराठा समाज आक्रमक होईल. त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला.
आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन भाषण करत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत शांत राहण्याचे आवाहन केले. पालकमंत्री सुभाष देसाई स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेत असताना महिलांनी त्यांना आपले निवेदन दिले.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने नोकरी आणि शिक्षणात तरुणांवर अन्याय झाल्याची भावना समाजात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी 42 जणांनी आपला जीव दिला. या बलिदानाची आठवण ठेवत सरकारने आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आरक्षण मराठा समाजाची गरज असल्याने सरकार न्याय देईल, असा विश्वास असल्याचे महिला आंदोलकर्त्यांनी सांगितले. मात्र, सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा एकदा आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा महिला आंदोलकांनी दिला.