औरंगाबाद- नोव्हेंबर महिन्यात अयोध्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. निकाल लागल्यावर शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलीस विभागाने खबरदारीचे उपाय घ्यायला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष असणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
अयोध्याचा निकाल लागल्यावर सोशल मीडियावर पोलिसांचे विशेष लक्ष
अयोध्येबाबतच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांचे सोशल मीडियावर कटाक्षाने लक्ष ठेवून असणार आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून औरंगाबाद पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
औरंगाबादेत पोलीस विभाग इंजिनीअर, व्यापारी, धार्मिक संदेश देणाऱ्या धर्मगुरूंच्या बैठकी घेत आहे. निकाल लागल्यावर सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. निकाल लागेल त्यादिवशी कोणालाही रस्त्यावर धार्मिक कार्यक्रम करणे अथवा निषेधात आंदोलन करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अयोध्येबाबत जो निर्णय होईल त्यावेळी शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून शहरात 3 हजार 500 पोलीस कर्मचारी, 200 अधिकारी कामावर असणार असून कोणत्याही कर्मचाऱ्याला सुटी नसणार आहे. इतकेच नाही तर बाहेरून पोलिसांची अतिरिक्त फोर्स मागवण्यात येणार आहे. त्याचबरोबर गरज असल्यास ड्रोन कॅमेराचा वापर केला जाणार असल्याचं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी खबरदारी घेण्यासाठी उपाय योजना घेत आहोत. टार्गेट ग्रुप आहेत जे शांतता भंग करू शकतात त्यांच्या बाबतीत काही उपाय योजना करत असून राजकीय लोकांनी वाद घालू नये यासाठी काळजी घेत आहोत, असे देखील पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. कामगार, विद्यार्थी यांच्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहोत. या आधी जामिनावर असलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येणार असून सोशल मीडियासाठी काही सूचना दिल्या आहेत. कोणीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड केले तर कारवाईचे आदेश असून त्याबाबत गंभीर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कलम 188, आयटी ऍक्ट नुसार, कुठलाही व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून आले तर एक ते तीन वर्षे शिक्षा होऊ शकते. त्यादिवशी इंटरनेट सेवा बंद करण्याबाबत निर्णय नंतर घेणार आहोत. निर्णय कधी येणार याबाबत निश्चितता कळल्यावर बंदोबस्त शहरात लागेल, अशी माहिती देखील औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.