महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण; राज्यातील एकूण संख्या 32 वर पोहोचली

औरंगाबाद याठिकाणी एक महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. यामुळे शहर भीतीचे वातावरण पसरले आहे. तर भीती बाळगण्याऐवजी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला
राज्यात 'आणखी' एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

By

Published : Mar 15, 2020, 2:25 PM IST

औरंगाबाद -देशात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. राज्यात पुण्यानंतर आता औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबादेतील एका 59 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे.

या महिलेच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तिच्या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगाबादेतील हा पहिलाच कोरोना बाधित रूग्ण आहे. या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ही महिला जवळपास सहा दिवसांपूर्वीच रशिया आणि कझाकिस्तानचा प्रवास करून औरंगाबादेत आल्याची माहिती समोर आली आहे.

सदरील महिलेचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ती ज्या लोकांच्या संपर्कात आली, त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या महिलेच्या कुटुंबाचीही तपासणी करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. याआधी दोन जणांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी एक नमुना हा निगेटिव्ह आला होता.

हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले ५ कोरोना बाधित रुग्ण; पुण्यातील रुग्णांचा आकडा १५ वर

कोरोनामुळे औरंगाबादेत बाधित रुग्ण येणार नाहीत, असे वाटत असताना 59 वर्षीय महिलेला बाधा झाल्याचे उघड झाल्याने शहरात अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. औरंगाबादेतील या महिला रूग्णाबरोबरच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. अशा वेळी भीती बाळगण्याऐवजी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details