औरंगाबाद - महानगरपालिकेत काम करणाऱ्या जवळपास 1700 कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही वेतन मिळत नाही. त्यामुळे काम बंद केल्याचे कामगार शक्ती संघटनेचे अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले.
चार महिन्यांपासून वेतन नसल्याने औरंगाबाद मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकजण भाड्याच्या घरात राहतात. त्यांना वेतन नसल्याने घरभाडे थकले आहे, तर अनेकांना घरात रेशन आणायला पैसे नसल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे आता वेतन मिळाल्यावर काम करू, अशी भूमिका स्वछता, आरोग्य तसेच मनपातील इतर महत्वाच्या विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. अशा अवघड परिस्थितीत महानगरपालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कुठलीही भीती न बाळगता काम केले. कोरोना योद्धा म्हणून कौतुक केले जात आहे. मात्र, याकाळात कर्मचाऱ्यांना वेतानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप खरात यांनी केला. कोरोनाचे सावट असताना देखील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कुठेही लक्ष देण्यात आले नाही. कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, बूट देण्यात आले नाही. त्यामुळे कुठलीच सुरक्षा साधने न वापरता या कर्मचाऱ्यांनी काम केले. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या वेतानाबाबत चालढकल कशासाठी? असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला.
वारंवार मागणी करूनही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता वेतन दिले तर काम करू. वेतन मिळणार नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर रुजू होणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.