औरंगाबाद - महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह मनपा अधिकाऱ्यांनी सायकल चालवत आज पालिका गाठली. महिन्याच्या पहिल्या कामाच्या दिवशी सायकल डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार आजपासून महिन्यातून एक दिवस सायकल चालवणार असल्याचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्ती नाही, मात्र विनंती केली आहे. इंधन बचत आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी महिन्यातून तीन-चार दिवस सायकल चालवली पाहिजे. त्यासाठी आजपासून महिन्याच्या पहिल्या कामाच्या दिवशी सायकलवर येऊन काम करण्याचा निश्चय केल्याचे आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.
शहरात जास्तीत जास्त नागरिकांनी सायकल चालवावी असे आवाहन आयुक्त पांडेय यांनी केले. याला सायकल असोसिएशनने प्रतिसाद दिला आहे. शहरात सायकल प्रेमींना एकत्र आणून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे देखील आयुक्तांनी सांगितले. याआधी अकोल्यात महानगरपालिका आयुक्त असताना असाच उपक्रम राबवला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. औरंगाबाद शहारातील नागरिक देखील या उपक्रमाला प्रतिसाद देतील, असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला.
सायकलसाठी वेगळा मार्ग...