औरंगाबाद - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. विविध स्तरातून शासनाला आर्थिक मदत मिळत आहे. यात शासकीय कर्मचारी देखील मागे नाहीत. औरंगाबाद महानगर पालिका आयुक्त आणि त्यांच्या पत्नी यांनी आपले एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीत दिले आहे.
लढा कोरोनाशी.. मनपा आयुक्त आणि त्यांच्या पत्नीने एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला - corona virau
कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारला साथ देण्यासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. औरंगाबाद महानगर पालिका आयुक्त आणि त्यांच्या पत्नी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला आहे. त्याचबरोबर महानगर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार दिला आहे.
![लढा कोरोनाशी.. मनपा आयुक्त आणि त्यांच्या पत्नीने एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला aurangabad Municipal Commissioner and his wife give one month salary to corona fund](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6596302-thumbnail-3x2-123.jpg)
मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील कोरोना रुग्णांची माहिती दिली. जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना बाधित नसून शहरात 112 लोकांना घरातच विलगीकरण करून राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे पांडेय यांनी सांगितले.
महानगरपालिका मोफत जेवण देणार नाही तर घरबसल्या जेवण देणार आहे. मनपा नगरसेवकांना दहा कुटुंबाना दत्तक घेण्याचं आवाहन केलं आहे. अनेक नगरसेवकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली. इतकंच नाही तर बाहेरून येणाऱ्या कामगारांची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. त्यांना राहण्याची व्यवस्था मंगल कार्यालय आणि मनपा शाळेत करण्यात येईल. तहसीलदारांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात येईल. सर्वसामान्यांना भाजी घेण्यासाठी शहरातील 107 मोकळ्या जागेवर सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला देण्याची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पत्रकार परिषदेत दिली.