औरंगाबाद - मोदी सरकारने केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. मात्र या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे मत औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारने पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच टाकली; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर - aurangabad
मोदी सरकारने केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या योजनांचे गाजर दाखविण्यात आले असून ते गाजर आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या तोंडाला लागले नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाल्याने त्यांना उत्पन्न मिळाले नाही. त्यामूळे या अर्थसंकल्पात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा असतील असे वाटत होते. मात्र, तसं काही झालं नसल्याने पदरी निराशा आल्याचे औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी म्हटले.
शेतकऱ्यांसाठी झिरो बजेट शेतीला प्राधान्य देण्याचा सरकारचा मानस असल्याचे अर्थसंकल्पात सांगितले गेले. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना घर बांधणी, शौचालय बांधणीसाठी योजना देणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले असले तरी शेतकरी सक्षम झाला तर तो हे सर्व स्वतःच्या पैश्यांनी करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल अशा घोषणा अपेक्षित असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.