औरंगाबाद - जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खासदार इम्तियाज जलील यांनी रिक्त जागा भरण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील जागा रिक्त आहेत. कोविडमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. आरोग्य विभागात काम करण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नसल्याची ओरड केली जात होती. जिल्ह्यात जवळपास दोन हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त असताना त्या भरल्या जात नव्हत्या. याबाबत जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे रिक्त जागा भरण्याची मागणी केली होती. मात्र भरती प्रक्रिया राबविण्याबाबत उदासीनता दिसून आल्याने खासदार जलील यांनी न्यायालयात धाव घेत स्वतःच वकिलाच्या भूमिकेत बाजू मांडली.
जिल्ह्यातील रिक्त वैद्यकीय जागा भरण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश न्यायालयाने सरकारला फटकारले
औरंगाबाद खंडपीठात रिक्त जागांसाठी याचिकेवर सुनावणी होत असताना, न्यायालयाने या रिक्त जागा कधी भरणार याबाबत विचारणा केली. मात्र यावेळी सरकारच्यावतीने कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारत चार वाजेपर्यंत माहिती द्या असा आदेश दिला होता. चार वाजता पुन्हा सुनावणी सुरू झाली असता, पुढील तीन महिन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल असं सांगण्यात आलं. त्यावर तिसरी लाट आल्यावर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे का? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. खासदार जलील यांनी न्यायालयाने सरकारला निर्देश द्यावे अशी विनंती केली. त्यावर पुढील आठ दिवसांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करून, दोन महिन्यांमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने सरकारला दिले आहेत. अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
हेही वाचा -अकलूज येथे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार