औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी रात्री १५ नवे रुग्ण आढळून आले. यामुळे चिंतेत भर पडली आहे. नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता १२० वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नवीन रुग्णांसोबत, नवीन हॉटस्पॉट देखील समोर येऊ लागले आहेत. असेफिया कॉलनी, नूर कॉलनी, समता नगर, किलेअर्क या हॉटस्पॉट नंतर आता पैठणगेट, गारखेडा, मुकुंदवाडी हे नवीन हॉटस्पॉट निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये, नवीन भागांमधील रूग्णांचा समावेश आहे. यामुळे समुह संसर्गाचा धोका वाढला आहे.
सोमवारी २९ रुग्ण वाढल्यानंतर, मंगळवारी दिवसभरात २३ रुग्णांची यात भर पडली तर रात्रीपासून आतापर्यंत १५ रुग्ण वाढले आहेत. रूग्णांची झपाट्याने वाढ ही चिंतेचा विषय ठरली आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नूर कॉलनी, भीमनगर, जय भीम नगर, गारखेडा गुरुदत्त नगर येथील रुग्ण आहेत. आढळून आलेले बहुतांश रुग्ण जुन्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याच समोर आले आहे. मात्र, काही जणांना संसर्ग कसा झाला याबाबत तपास सुरू आहे.