औरंगाबाद - काँग्रेस पक्षाकडून 'कोविड-19 प्रदेश कॉंग्रेस टास्क फोर्स समिती' तयार करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आहेत. या समितीची बैठक आज (गुरुवार) घेण्यात आली. या बैठकीत औरंगाबादहून काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह राज्यातील जवळपास 15 ते 20 सदस्यांनी सहभाग घेतला होता. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
कोविड-19 प्रदेश कॉंग्रेस टास्क फोर्स समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक... हेही वाचा....लॉकडाऊनमुळे हुतात्मा जवानाच्या मातेवर उपासमारीची वेळ, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेट घेऊन केली मदत
या बैठकीत डॉ. कल्याण काळे यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील परिस्थिती चव्हाण यांना सांगताना काही मागण्या केल्या आहेत. लॉकडाऊनचा काळ सुरु आहे. सर्वजण कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत आहे. या काळात शहरी भागातील रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य वाटप करण्यात यावे. ज्यांचे राशन कार्ड ऑनलाईन नसेल त्यांनाही धान्य आणि गॅस देण्यात यावा. महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, नागपुर वगळता ऊर्वरीत राज्यभर लॉकडाऊन शिथील करावा. औरंगाबाद शहरातील बाहेरील भागात टॅंकरने पाणीपुरवठा मोफत करण्यात यावा, अशा मागण्या त्यांवी केल्या.
औरंगाबाद शहरात कोरोना तपासणीची केंद्रे दोन आहेत. ती केंद्रे वाढवण्यात यावीत. मास्क, सॅनिटायझर आदींचे वाटप करण्यात यावे. तसेच ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे फळे, भाजीपाला विक्री न झाल्याने झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी. तुर, कापुस, गहु या शेतमालाची खरेदी ऑनलाईन न करता ऑफलाईन व्हावी.
खरीप हंगामाची तयारी करताना खते, बियाणे, औषधे ही शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावरच देण्यात यावी. या आणि अशा अनेक महत्वाच्या मागण्या डॉ. कल्याण काळे यांनी समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत.