छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते बरेचदा अडचणीतही सापडले आहेत. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याबाबत दिलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाने सुनावणी घेत हे आदेश दिले आहेत.
काय आहे प्रकरण? : इंदुरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या कीर्तनातून सम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगी होते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण सेशन कोर्टाने गुन्हा रद्द केला होता. सेशन कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत.