औरंगाबाद - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तीन महाविद्यालयांसह सहा महाविद्यालयांसाठी राज्य शासनाने दिलेले इरादापत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले. विद्यापीठ कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थितीत इरादापत्र देण्याचा सरकारला अधिकार आहे. मात्र, त्याची कारणे देणे गरजेचे असते. या प्रकरणात तसे नमूद करण्यात आलेले नसल्याचे सांगून न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर. एम. लड्डा यांनी हा आदेश दिला.
दोन महाविद्यालयांनी घेतली न्यायालयात धाव -
सारोळा, अंभई व अंधारी, सिल्लोड शहर, अजिंठा, बनोटी (ता. सोयगाव) या सहा ठिकाणी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी संबंधित संस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवले हाेते. यंदा विद्यापीठाकडे एकूण 182 प्रस्ताव प्राप्त झाले होते. मात्र, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने त्रुटी काढून 170 प्रस्ताव नकारात्मक शिफारशीसह शासनाकडे पाठविले. तर 12 प्रस्तावांबाबतच सकारात्मक शिफारस केली. हे प्रस्ताव शासनाच्या इरादापत्रासाठी हाेते. त्यानुसार शासनाने 12 पैकी 5 प्रस्तावांना इरादापत्र मंजूर केले. तर नकारात्मक प्रस्तावातील 170 पैकी 65 प्रस्तावांनाही आदेशानुसार इरादापत्र दिले. त्यामुळे इरादापत्र न मिळालेल्या दोन संस्थांनी या निर्णयाला खंडपीठात आव्हान दिले हाेते.