औरंगाबाद -जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता हॉटेलमध्ये बसून, जेवण करण्यास बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. बुधवार 17 मार्च पासून ते 4 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असणार आहे. या काळात पार्सल व्यवस्था मात्र चालू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी दिवसभरात 1035 इतके नवीन रुग्ण आढळून आल्याने, प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत सतत होणारी वाढ पाहता प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जिल्ह्यात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. मात्र तरीदेखील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
हॉटेलमध्ये बसून जेवण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हॉटेल ठरत आहेत हॉटस्पॉट
गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता 11 मार्चपासून क्षमतेपेक्षा अर्ध्याच ग्राहकांना सेवा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून पाहणी केली असता, हॉटेल वर लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. जेवण करायचे असल्याने, नागरिक तोंडावरील मास्क काढतात. पुन्हा मास्क न घालताच हॉटेलमध्ये वावरतात. तसेच हॉटेलमध्ये गर्दी देखील अधिक होत आहे. त्यामुळे आता 4 एप्रिलपर्यंंत हॉटेल बंद ठेवून केवळ पार्स सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.