औरंगाबाद - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांतिचौक पोलिसात तरुणाला शिवीगाळ करणे, जातीवाचक बोलणे याबाबत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर माझ्यावर दाखल झालेला गुन्हा राजकारणातून प्रेरित असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे, हा गुन्हा मुद्दाम दाखल करायला लावला असल्याचा आरोप जाधव यांनी शिवसेनेवर केला.
शिवसेनेचे माजी आमदार आणि नुकतेच मनसेत दाखल झालेले हर्षवर्धन जाधव यांची काही जमीन जालना रस्त्यावर आहे. याच ठिकाणी त्यांनी लोकसभा निवडणुकीत आपले प्रचार कार्यालय थाटल होते. मात्र, त्याठिकाणी रस्त्यावरच एकाने टपरी सुरू केली. यानंतर टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार आल्याने क्रांतिचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हर्षवर्धन जाधव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.