औरंगाबाद- ऑक्टोबर महिन्यानंतर आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा डोकंवर काढू लागल्याने प्रशासनाने वैद्यकीय सुविधा सज्ज केली आहे. याआधी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता, त्यापेक्षा दुपटीने यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा दुसरा प्रकार मराठवाड्यात दाखल झाल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, अद्याप हा दुसरा प्रकार नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे.
रुग्णांची वाढती संख्या दुसऱ्या कोरोना प्रकारची आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत नमुने पाठवल्यानंतर त्याची निश्चित माहिती मिळू शकेल. युरोपीयन राष्ट्रात खासकरून ब्रिटन, ब्राझील आणि आफ्रिकेत नव्या प्रकारचा विषाणू थैमान घालत असून आपल्याकडेही तोच आहे का? हे मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर निश्चित कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते. गर्दीच्या कार्यक्रमांपासून हा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सातारा देवळाई ठरतोय हॉटस्पॉट
कोरोना बाधितांचे संख्या शहरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच शहराच्या लगत असलेला सातारा देवळाई भाग हा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. या भागात एकाच घरात चार ते पाच व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे या भागात स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आल आहे. ही बाब चिंतेचे असून नागरिकांनी स्वतःहून चाचणी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळेच या भागात आता स्वातंत्र्य वैद्यकीय पथक नेमण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दिली.
मंगल कार्यालय आणि शिकवणी वर्गांवर विशेष लक्ष..
लग्नसमारंभात होणारी गर्दी पाहता ही धोक्याची घंटा असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच मंगल कार्यालयांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. एखादा समारंभ असला किंवा विवाहसोहळा असला तर त्यावेळी कोविडचे नियम पाळले जातात का? हे पाहण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. मंगल कार्यालयचालक हलगर्जीपणा करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि पंधरा दिवसांसाठी मंगल कार्यालय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून शिकवणी वर्गही सुरू झाले आहेत. त्याठिकाणी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्गांमध्ये हलगर्जीपणा आढळून आला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिल्या आहेत.
यंत्रणा करण्यात आली सज्ज...
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्यासोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नागरिकांच्या तपासणी वाढविण्याबाबत सूचना करण्यात आले आहेत. त्यानुसार कोविडच्या संशयित रुग्णांच्या तपासणीत वाढ करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये सुरुवातीला रोज 8000 पर्यंत संशयित रुग्ण तपासणी करत होते. मात्र, जवळपास दोन हजारापर्यंत तपासणी करण्यात आहेत. आता या तपासणी वाढवण्यात येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात अकरा हजार 764 इतक्या रुग्णसंख्या क्षमता सज्ज आहे. त्यामध्ये ऑक्सिजन बेड 2124, आयसीयु 532 आणि व्हेंटिलेटर 300 अशी यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे दिली.