औरंगाबाद - लोकांनी माणुसकी दाखवली असती तर सुमितचा जीव वाचला असता, हे शब्द आहेत औरंगबादमध्ये अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सुमित कवडे या तरुणाच्या आईचे. अपघात झाल्यानंतर सुमित एक तासापर्यंत रस्त्यावरील बघ्यांना मदतीची विनंती करत होता. पण, लोकांनी त्याला मदत न करता व्हिडिओ काढणे पसंद केले. लोकांनी आभासी जगात न रमता भावनेसारखी कृतीही करणे आवश्यक आहे, असे मानसोपचार तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
कुणीच मदत न केल्याने सुमीतच्या काकाने खंत व्यक्त केली
३० एप्रिलला सुमित कवडे आणि सचिन गाडेकर हे दोघे मित्र दौलताबादजवळ एका हॉटेलात जेवायला गेले होते. तेथून परत असताना त्यांच्या दुचाकील एका ट्रकने समोरुन जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले, त्यावेळी जखमी सुमित रस्त्यावरील लोकांकडे मदतीसाठी याचना करत होता. मात्र, बघ्यांनी फक्त व्हिडिओ काढणे आणि फोटो काढणेच पसंद केले. कुणीही त्यांना मदत केली नाही.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कुटुंबातील सुमित-
अखेर काही वेळाने रुग्णवाहिका दाखल झाली आणि त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, रुग्णालय प्रशासनाकडूनही योग्य मदत मिळाली नसल्याचे सुमितच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. तेथून खासगी रुग्णालयात जात असताना सुमितने प्राण सोडला. सुमितचे काका राकेश कवडे हे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करतात. पण, त्यांच्या स्वतःच्या पुतण्यालाच वेळेवर मदत मिळू शकली नाही. त्यामुळे ते दुःख व्यक्त करतात.
बदलत्या जीवनशैलीमुळे लोक आत्मकेंद्री होत आहेत. व्हिडिओ गेम्समुळे हिंसा पाहणे लोकांच्या सवयीचे झाले आहे. यामुळे रक्त, मारामारी या गोष्टींनी आता संवेदना जागृत होत नाहीीत. त्यामुळे मदत करण्याची वृत्ती हरपत चालल्याचे मानसोपचार तज्ज्ञ अपर्णा अष्टपुत्रे यांनी सांगितले. यानंतर तरी लोकांनी वेळेवर कृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.