औरंगाबाद -ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवार) सकाळपासून होणार आहे. मतमोजणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतमोजणीचा निकाल शांततेत स्वीकारा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ५७९ ग्रामपंचायतींसाठी ९ लाख ४२ हजार ५३५ मतदारांनी शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात नऊ तालुक्यांत मतमोजणी केली जाणार आहे. साधारणत: दुपारी एक वाजेपर्यंत निकाल लागतील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी दिली.
५७९ ग्रामपंचायतीचा आज फैसला
जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामध्ये ३८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे उर्वरित ५७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. यामध्ये वैजापूर तालुक्यात सर्वाधिक ९६, औरंगाबाद ७१, पैठण ७८, फुलंब्री ४९, सिल्लोड ७७, सोयगाव ३६, कन्नड ८०, खुलताबाद २५, गंगापूर ६७ ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होतील.
अशी आहे नियमावली
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्यास बंदी असून, मिरवणुकीची परवानगी नाही.
- कार्यकर्त्यांना एकत्र येऊन कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा करता येणार नाही.
- धार्मिक व जातीय भावना दुखावतील असे कृत्य करता येणार नाही.