औरंगाबाद - प्रेम बंधनात अडकलेले जोडपे नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आल्यानंतर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. ही घटना औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी जोडप्याला ताब्यात घेऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली केले आहे.
औरंगाबादमध्ये विवाह नोंदणीसाठी आलेल्या जोडप्यास मारहाणीचा प्रयत्न काय आहे प्रकरण-
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूज परिसरातील साजापूर भागातील शुभम सोनार याचे परिसरातील एका 18 वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते. मुलीने शुभमसोबत लग्न करण्याचा घरच्यांकडे हट्ट धरला होता. मात्र, दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्याने घरातील मंडळींनी लग्नाला विरोध केला. तरुणी गेल्या 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. या प्रकरणी मंगळवारी सकाळी मुलीच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तरुणी हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
हे जोडपे मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी पोहोचले. हे दोघेजण खरेदी करत असताना काहीजण त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मुलीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी ऐकत नसल्याचे दिसताच त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात तणाव निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला ताब्यात घेतले. ही मुलगी बेपत्ता असल्याची नोंद एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल असल्याने त्या दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दोघांच्या आई-वडिलांना बोलावून घेतले आहे.