औरंगाबाद - शहरातील पाडेगाव भागातील मिसबाह कॉलनीत चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली. नागरिकांनी केलेल्या दगडफेकीमुळे चोरटे पळाले, अन्यथा चोरट्यांनी डाव साधला असता. देवळाई भागातील 25 लाखाची रोकड असलेले एटीएम पळविल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच ही घटना घडली. यामुळे शहरातील एटीएम सुरक्षा वाऱ्यावर आहे की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावरील देवळाई येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यानी पाळविल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या एटीएम मशीन मध्ये 25 लाख रुपये रोकड होती. या घटनेला 24 तासही उलटत नाहीत, तोच आज ही घटना घडली. पहाटे सुमारे तीन-साडे तीन वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या तवेरा गाडीने एटीएमजवळ आले. त्यानंतर दोन जण गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत होते.
एक जण उजेड बाहेर जाऊ नये म्हणून पारदर्शी दरवाज्यावर चादर धरून उभा होता. एक जण बाहेर रेकी करीत होता तर पाचवा वाहन सुरू करून गाडीत बसला होता. चोरटे एटीएम फोडत असताना साहित्य खाली पडण्याचा आवाज आल्याने इमारतीचे सुरक्षारक्षक शेख समद अहेमद (वय 73) गॅलरीत उभे असताना त्यांनी चोरट्यांना पाहिले. भेदरलेल्या वृद्धाने 100 नंबरवर पोलिसांना माहिती देण्यासाठी कॉल केला. मात्र, तो कॉल घेतला गेला नाही, त्यामुळे शेजारील काही नागरिकांना त्यांनी कॉल करून माहिती दिली. कुठलीही मदत मिळत नसल्याने वृद्धाने धाडस करीत चोरट्यावर दगडफेक केली. प्रत्युत्तरात चोरट्यांनी दगडफेक करत पोबारा केला. या घटनेप्रकरणी आज शेवटची माहिती हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.