औरंगाबाद - मास्क न घातलेल्या नागरिकांकडून महानगरपालिकेच्या पथकाकडून दंड वसून करण्यात येत आहे. सोमवारी सकाळीदेखील महानगरपालिकेच्या पथकातर्फे एका विद्यार्थ्याकडून दंड वसूल करताना उपस्थित काही व्यापाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेच्या पथकाला व्यापाऱ्यांनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचादेखील समावेश आहे.
विद्यार्थ्यांवर कारवाई -
गुलमंडीवर सोमवारी सायंकाळी महापालिकेचे पथक मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यावेळी या पथकाने एका विद्यार्थ्याला पकडले. त्याच्याकडून दंडाची वसुली केली जात होती. दरम्यान तेथे उपस्थित असलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाला समजावून सांगितले. मात्र, पथक काही एक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेवढ्यात माजी आमदार किशनचंद तनवाणीदेखील तेथे आले. त्यांनी देखील पथकाला हवे, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, पण त्या विद्यार्थ्याला सोडा असे म्हणाले. त्यावर पथकाने तनवाणींसोबत अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी पथकाला मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने क्रांती चौक पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली.