छत्रपती संभाजीनगर ATS Notice in Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर शहरातील 11 जणांना उत्तर प्रदेश एटीएसकडून नोटीस बजावण्यात आलीय. इतकंच नव्हे तर या सर्वांना 18 जानेवारीपर्यंत लखनऊ येथील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याबाबतही नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रानं माहिती दिली. काही दिवसांपूर्वी शहरात एक बैठक झाली होती. ही बैठक इसिसच्या कट्टर समर्थकांनी घेतल्याबाबत एक व्हिडिओ क्लिप उत्तर प्रदेश एटीएसच्या निदर्शनास आलीय. त्यानुसार शहरात येऊन या 11 जणांना नोटीस बजावण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय.
शहरात झाली इसिसची बैठक : सप्टेंबर 2023 मधे देशात जानेवारी महिन्यात घातपात घडवण्याच्या उद्देशानं शहरात एक बैठक घेण्यात आली. तेलंगणा पोलिसांना याबाबत काही पुरावे हाती लागले होते. त्यानुसार इसिस संघटनेच्या कट्टर समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक सप्टेंबर महिन्यात शहरातील एका ठिकाणी पार पडली. त्याचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला. त्याबाबत तपासणी केली असता, उत्तर प्रदेशात जानेवारी महिन्यात घातपात घडवण्याबाबत चर्चा झाली. हे सर्व पुरावे तातडीनं उत्तर प्रदेश एटीएसकडे देण्यात आले. त्यावर एटीएसनं तपास केला असता, संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागातील 11 जणांचा सहभाग असल्याचं आढळून आलय. त्याबाबत शहरात पथक दाखल झालं. त्यांनी झाडाझडती घेत प्राथमिक कारवाईदेखील केली. मात्र, याबाबत स्थानिक पोलिसांनी माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे युपीच्या एटीएसच्या कारवाईबाबत अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही.