औरंगाबद- भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करणारे कोणी नसल्याने ते दारोदारी फिरुन पोट भरण्याचे काम करता. मात्र, अशा कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास 100 कुत्र्यांचा त्यांनी सांभाळ केला आहे. कुत्र्यांना रोज खाद्य देऊन त्यांची वैद्यकीय देखभालही केली जाते. आशिष जोशी, आदिनाथ बलांडे आणि चिन्मय दिवेकर असे त्या तरुणांची नावे आहेत.
100 भटक्या कुत्र्यांचा सांभाळ.... हेही वाचा-'सिंचन घोटाळ्याचा तपास योग्य दिशेने, तपास यंत्रणा बदलण्याची गरज नाही'
आशिष जोशीने त्याच्या मित्रांसोबत भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करुन एक आदर्श वसा हाती घेतला आहे. आशिष आणि त्याच्या मित्रांनी आजपर्यंत 100 हून अधिक भटक्या कुत्र्यांची काळजी घेतली आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्या सर्वच ठिकाणी आढळून येतात. अन्न मिळाले नाही तर कुत्रे उपद्रव माजवतात. अशा कुत्र्यांना सांभाळण्याचे काम आशिष जोशी आणि त्याचे मित्र करतात.
विश्वभारती कॉलनी परिसरात असलेल्या कुत्र्यांना रोज जेवण देणे, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणे असे काम हे तरुण करतात. या तरुणांचा परिसरातील कुत्र्यांना लळा लागला आहे. तरुणांच्या एका इशाऱ्यावर सर्व कुत्रे जमा होतात. कुत्र्यांपासून कोणाला इजा होणार नाही याची काजळीही घेतली जाते. तसेच परिसरातील सर्वच कुत्र्यांची नसबंदी महानगरपालिकेच्या माध्यमातून केली आहे.
'रस्त्याने जाताना काही पिल्लं त्यांच्या आईसह दररोज दिसायची. मात्र, एक दिवस त्या आईचा अचानक गाडीखाली येऊन मृत्यू झाला. त्यानंतर पिल्लांचे हाल होऊ लागले. ते हाल त्यांना पाहावले गेले नाहीत म्हणून त्यापैकी एका पिल्लाला आशिषने घरी आणले आणि तेव्हापासून त्याला कुत्र्यांचा लळा लागला'. आता तो त्याच्या मित्रांसमवेत शहरातील अनेक भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करण्याचे काम करतो आहे. यातून आनंद मिळत असल्याचीही प्रतिक्रिया आशिष आणि त्याच्या मित्रांनी यावेळी दिली.