औरंगाबाद - कोरोनाचे सावट भारतातील अनेक पारंपरिक सणांवर झाले आहे. मार्च महिन्यापासून बहुतांश सार्वजनिक सण, पारंपरिक उत्सव करू नये म्हणून सरकारने फर्मान जारी केले आहे. वारकरी संप्रदायाचा पारंपारिक उत्सव म्हणजे आषाढी एकादशीची वारी, परंतु यावर्षी वारीची पायी जाण्याची परंपरा खंडित झाली. त्यातच शहरातील अनेक जुनी मंदिरंदेखील बंद असल्यामुळे भक्ताविना आषाढी एकादशीची पूजा अर्चा करून करण्यात आली. साडेतीनशे ते चारशे वर्षांची परंपरा असलेल्या औरंगपुरा नाथ मंदिरात गेटमध्येच विठुरायाची प्रतिमा ठेऊन बाहेरूनच दर्शन देण्याची सोय केली आहे.
भक्तांविना साजरी होत आहे आषाढी एकादशी..
कोरोनाच्या संकटामुळे औरंगाबाद शहरातील अनेक जुनी मंदिरंदेखील बंद आहेत. त्यामुळे भक्ताविना आषाढी एकादशीची पूजा अर्चा करून करण्यात आली. साडेतीनशे ते चारशे वर्षांची परंपरा असलेल्या औरंगपुरा नाथ मंदिरात गेटमध्येच विठुरायाची प्रतिमा ठेऊन बाहेरूनच दर्शन देण्याची सोय केली आहे.
औरंगपुरा स्थित नाथ मंदिर हे संत एकनाथ महाराज यांचे पदस्पर्श लाभलेले मंदिर आहे. आषाढी एकादशी हा उत्सव सुमारे साडेतीनशे वर्षांपासून मोठ्या भक्ती भावाने मंदिरात साजरा केला जातो. एक दिवस आधी मंदिराचा परिसर स्वच्छ धुवून मंदिराची मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. लॉकडाऊन आधी मंदिरात नाथषष्ठी उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला आणि कोरोनाची सुरूवात झाली. गेल्या काही महिन्यांपासून भाविकांसाठी मंदिर बंद आहे. रोज सकाळी पुजारी येऊन नित्य पूजा करून जातात. आषाढी एकादशीसाठी काल मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. लायटिंग, फुलांची सजावट करण्यात आली. पहाटे मंदिर ट्रस्टचे सचिव पुजारी यांच्यासह दोन भाविक अभिषेक करणासाठी उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा मंदिर बंद करण्यात आले.
आज भाविकांचा भ्रमनिरास होऊ नये म्हणून, विठुरायाची प्रतिमा गेटसमोर ठेऊन तिचीही विधिवत पूजा करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त असणारा सप्ताह कोरोनाच्या संकटामुळे करण्यात आला नाही. बाकी सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आल्याचे मंदिराचे व्यवस्थापक सोमनाथ शेलार यांनी सांगितले.