छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भागात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात भक्तांनी लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा भरत आहे. आठ ते दहा लाख भाविक नित्यनेमाने दर्शन घेतात. यंदा 200 हून अधिक दिंड्यांचा सहभाग पाहायला मिळाला. लाखो वारकरी पावली खेळत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूर परिसरात दाखल झाले. त्यावेळी तेथील मुस्लिम बांधवांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेऊन वारकऱ्यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी देखील वारकऱ्यांसोबत एकरूप होत रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे.
वारीत सहभागी होऊन जपली सामाजिक बांधिलकी :टाळ वाजवत, देवाचे नामस्मरण करत पोलीसही सर्वसामान्यांसोबत आहेत, असा विश्वास त्यांनी निर्माण केला. काही अडचण असेल तर तातडीने पोलिसांना कळवा, अशी जनजागृती या निमित्ताने पोलिसांनी केली. एकीकडे गणवेशातील पोलीस वारीत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत होते, तर दुसरीकडे गणेवश न घालता आपले कर्तव्य बजावत होते. आषाढी एकादशीला चोरीच्या उद्देशाने किंवा महिलांना त्रास देण्याच्या उद्देशाने आलेल्या 48 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.