औरंगाबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून औरंगाबाद शहरातील तीनही मतदारसंघाच्या उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. पुर्वमधून डॉ. गफ्फार कादरी, मध्यमधून नासेर सिद्दीकी तर पश्चिममधून अरुण बोर्डे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पक्षामध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात एमआयएमला चांगली मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली होती. विशेषतः म्हणजे इम्तियाज जलील आमदार राहिलेल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात इच्छुकांची लक्षणीय संख्या पाहायला मिळाली. नासेर सिद्दीकी यांच्या उमेदवारीची मध्य विधानसभा मतदार संघात बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील मतदारसंघात उमेदवार निवडीवरून नाराजीनाट्य होऊ नये, यासाठी प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी या तीन्ही मतदारसंघातील उमेदवारीचा चेंडू पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कोर्टात टोलवला होता. अखेर ओवेसी यांनी शहरातील तीनही मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे डॉ. गफ्फार कादरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कादरी गेल्या निवडणुकीत अवघ्या 4200 मतांनी पराभूत झाले होते.
हेही वाचा - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात मित्र पक्षाचा सेनेला धोका