औरंगाबाद (गंगापूर) - शासकीय यंत्रणेची मान शरमेने झुकावी अशी घटना आज बुधवार (दि. 27 जुलै)रोजी गंगापूर तालुक्यातील लखमापूर येथे घडली. पोटात दुखू लागल्याने आठ वर्षीय मुलाला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना चिखलात गाडी अडकली. ती गाडी काढण्यात खूप वेळ गेला. यामुळे आजारी मुलाला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. याचा परिणाम त्या मुलाचा दुचाकीवरच प्राण गेला. वर्षानुवर्षे दुरुस्त होऊ न शकलेल्या या रस्त्याच्या दुरवस्थेने मुलाचा बळी घेतला. गंगापूर तालुक्यातील जुने लखमापूर ते लखमापूर रस्त्यावर सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णा बाबुलाल परदेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
रस्त्यामुळे झाला मृत्यू -सकाळी सहा वाजता कृष्णा परदेशी या मुलाला उलटी झाली व पोटात दुखायला लागल्याने अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे कृष्णाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील बाबुलाल परदेशी हे मोटारसायकलवर निघाले. मात्र, वाटेतील चिखलात गाडी फसली. आधीच काळी माती आणि त्यात चिखल झालेल्या रस्त्यावर परदेशी यांनी तासभर झटूनही मोटारसायकल निघाली नाही. मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला मार्गउपलब्ध नव्हता. याच काळात वेळेवर उपचार मिळू न शकल्याने कृष्णाचा मोटरसायकलवरच मृत्यू झाला. या मुलावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.