महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 20, 2019, 6:07 PM IST

ETV Bharat / state

मराठवाड्यातील कृत्रीम पाऊस पाडण्याचा प्रयोग अद्यापही हवेतच

मराठवाड्यात कृत्रीम पावसाचा प्रयोग कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

औरंगाबाद -राज्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे सरकारने कृत्रीम पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले. मात्र, सोलापूर येथे याबाबतची यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या हालचालींनी वेग आला असला तरी मराठवाड्यात ही यंत्रणा अद्याप कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे हा प्रयोग मराठवाड्यात कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय आणि सी-बँड डॉप्लर रडारची दृश्ये

औरंगाबादेत २० जुलैपर्यंत सी-बँड डॉप्लर रडार बसवून २५ जुलैनंतर कृत्रीम पावसासाठी विमान उड्डाण घेण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, अद्यापही कृत्रीम पाऊस पाडायचे रडारच औरंगाबादेत पोहचले नसल्याने हा प्रयोग सुरू होणार कधी हा प्रश्न निर्माण होत आहे.

कृत्रीम पावसाच्या प्रयोगासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या, यापैकी ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीची निविदा अंतिम करण्यात आली आहे. कृत्रीम पावसासाठी आवश्यक असलेले सी-बँड डॉप्लर रडार स्वित्झरलँड येथून निघाले असून, येत्या काही दिवसांमध्ये हे रडार भारतामध्ये येणार आहे. २० जुलैपर्यंत औरंगाबादमध्ये रडार बसवण्यात येणार आहे. ही कंपनी यावर्षीही १०० तास मोफत उड्डाण करणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर डॉप्लर रडारसह नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्यात येणार आहे. या कक्षामध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी’चे (आयआयटीएम) शास्त्रज्ञ, नेमका पाऊस किती पडला याच्या नोंदी घेण्यासाठी तटस्थ लेखापरीक्षणासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रयोग सरकारचा असल्यामुळे रडार, विमान उड्डाणासंदर्भात आवश्यक ते परवाने मिळण्यास फारसा वेळ लागणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

यंदा राज्यात मान्सून उशिरा आला. शिवाय कोकण, मुंबई या भागामध्ये प्रथम मान्सूनचा होणारा पाऊस यावर्षी विदर्भ, मराठवाड्यामध्ये झाला. मान्सूनचा प्रवास, कधी पुढे सरकणार आदी बाबींची निरीक्षणे हवामान विभागातील तज्ज्ञांनी केली होती. त्यामुळे जुलैनंतर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येत असून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचे ढग राहतील त्यामुळे प्रयोग होईल, असेही त्यांनी सांगितले. २०१५ मध्ये औरंगाबाद येथे १०० तासांवर १०० तास मोफत या तत्वावर ख्याती वेदर मॉडिफिकेशन या संस्थेला प्रयोगाकरिता २७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते, याच प्रमाणे यंदाही प्रयोग करण्यात येणार असला तरी जुलै महिना संपत आला तरी यंत्रणा कार्यान्वित होणार कधी हा प्रश्चच आहे. सोलापूरला लावलेल्या रडारचा वापर करुन मराठवाड्यात पाऊस पाडण्याचा विचार असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तवला असला तरी हा प्रयोग मराठवाड्यासह विदर्भच्या काही भागात उपयोगी पडेल का? हा प्रश्नच आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details