औरंगाबाद - किलेअर्क येथील कोविड सेंटर येथून फरार झालेल्या ‘हर्सूल’ कारागृहाच्या कोरोनाबाधित एका कैद्याला सिटीचौक पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिल्लीगेट परिसरात या कैद्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तर एक कैदी अद्याप फरार आहे.
हर्सूल कारागृहातील 29 बंदीना कोरोनाची बाधा झाल्याच निष्पन्न झाले होते. त्यावेळी त्यातील काही बंदीना किलेअर्क येथील कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री सैय्यद सैफ आणि अकरम खान आयज खान हे दोन कैदी फरार झाले होते. त्यापैकी सैय्यद सैफला पोलिसांनी जेरबंद करून कारागृह पोलिसांच्या हवाली केले आहे.
किलेअर्क येथील बाथरूमच्या खिडकीचे काच आणि गज काढून कोरोनाबाधित दोन रुग्णांनी पळ काढला होता. या दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी बेगमपुरा आणि हर्सूल कारागृह पोलिसांनी जागोजागी छापे मारत शोध घेतला. मात्र, दुपारच्या सुमारास सिटीचौक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीगेट परिसरात सय्यद सैफ हा आरोपी दडून बसल्याच कळाले.
त्यानुसार देशराज मोरे, शंकपाल, गायकवाड व पटेल या कर्मचार्यांनी सापळा रचला आणि सय्यद सैफला अटक केली. अटक केलेला सय्यद सैफ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याला ताब्यात घेताना अनेक अडचणी होत्या. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी सय्यद सैफला अटक करून हर्सूल कारागृह पोलिसांच्या ताब्यात दिले. लवकरच दुसऱ्या फरार आरोपी अकरम खानला अटक केली जाईल, अशी माहिती कारागृह निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली.