औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढल्याने राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यावर अगोदरच बंदी घालण्यात आली आहे. पैठण येथे दरवर्षी भरणारी नाथषष्ठी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे दिली. मात्र मंदिरामध्ये पारंपरिक पूजाअर्चा होणार आहे.
गेल्या चारशे वर्षाची परंपरा लाभलेला नाथषष्ठी यात्रा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. यात्रा उत्सव रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली असून सोहळ्याचे यंदा 423 वे वर्ष होते.
पैठण येथे दरवर्षी भरणारी नाथषष्ठी यात्रा रद्द जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आदेश-
नाथषष्ठी महोत्सव नियोजनाप्रमाणे 30 मार्च रोजी तुकाराम बीज पासून सोहळ्याला प्रारंभ होतो. 2, 3 व 4 एप्रिल रोजी षष्ठीचे नियोजन होते. मात्र जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विशेष अधिसूचना काढत यात्रा महोत्सव रद्द केला. यावर्षी नाथषष्ठी होणार नाही. मात्र पारंपरिक पूजाअर्चा नियमांचे काटेकोरपणे पालन करत करणार असल्याचे संस्थेद्वारे सांगण्यात आले.
कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता-
नाथषष्ठी निमित्त महाराष्ट्र राज्याच्या सर्व भागातून भाविक मोठ्या संख्येने श्रीक्षेत्र पैठण येथे येतात. जवळपास पाचशे दिंडीमध्ये लाखापेक्षा अधिक स्त्री-पुरुष तीनशे ते चारशे किलोमीटर अंतर पायी चालत येतात. तीन दिवस मुक्कामी राहतात आणि हा सोहळा साजरा करतात. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. यात्रेमध्ये राज्यातील अनेक भागातून लाखोच्या संख्येने भाविक येतील. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण होईल, या कारणाने प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा-स्कॉर्पिओ सापडण्यापासून वाझेंच्या अटकेपर्यंत, असा राहिला घटनाक्रम