छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :दोन दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी अचानक शहरात हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना नोटीस बजावली आहे. अंबादास दानवे यांना शनिवारी दुपारनंतर स्पीड पोस्टाने 18 पानांची नोटीस मिळाली आहे. मात्र, ही नोटीस कशाबद्दल आहे, हे अद्याप पाहिलं नाही. आपण अशा नोटीसला घाबरत नाही. त्यांना कायदेशीर सडेतोड उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिलीयं.
किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ : काही दिवसांपूर्वी किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला होता. त्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. विधान परिषदेच्या सभागृहात अंबादास दानवे यांनी या व्हिडिओची सत्यता पडताळणी करून कारवाई करण्याची मागणी केली. तसंच त्यासंबंधीचा एक पेन ड्राईव्ह विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्याप्रकरणी ही नोटीस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमैय्या दानवेंची विमानतळावर भेट : भाजपा नेते किरीट सोमैय्या 16 ऑगस्टच्या संध्याकाळी शहरात दाखल झाले होते. मोठा पोलीस, फौजफाटा घेऊन त्यांनी शहरात काही ठिकाणी भेटी देखील दिल्या होत्या. त्यावेळी विमानातून येत असताना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची विमानतळावर त्यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळेस त्यांनी तुम्हाला लवकरच एक नोटीस पाठवणार असल्याचं सूचक वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यावर ही नोटीस प्राप्त झाल्यावर आता विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नेमकं काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.