छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Ambadas Danve Criticized Kesarkar:शाळांच्या मान्यता देण्यासाठी पंचवीस कोटींची ऑफर आली मात्र आपण ती फेटाळली असल्याचं धक्कादायक विधान शिक्षणमंत्री केसरकर यांनी केलं. मात्र दीपक केसरकर यांनी त्यांच्या खालचे लोक काय करतात ते पाहावं, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रालयातील कामे दलाल करतात असा आरोप केला, त्यात सत्यता आहे, असं दानवे म्हणाले. आजही काही काम करायचं असंल तर दलालासाठी टेंडर काढली जातात. काम ठरलेलं असतं आणि ते करणारे देखील ठरलेले असतात. कसा भ्रष्टाचार होणार हे पहिलं जातं, माहीत असताना मंत्री उघड्या डोळ्याने पाहतात आणि सह्या करतात. साध्या एका शिक्षकाच्या संच मान्यतेसाठी किती पैसे द्यावे लागतात ते पाहा असं म्हणत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला.
ओबीसी बैठकीला का नाही बोलावले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र या बैठकीला आम्हाला बोलावले नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले. आता का नाही? जेंव्हा अंगावर येते तेंव्हा सर्वपक्षीय बैठक म्हणून दिखावा करतात. मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीयांना बोलावलं आणि आता ओबीसी आरक्षणात आम्हाला विश्वासात घेतलं नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मराठी माणसाला घर नाकारणे चुकीचे -मुंबईत मराठी भाषिक असल्याने एका महिलेला कार्यालयासाठी जागा देण्यात आली नाही. मुलुंड सारख्या भागात मराठी माणसाला घर देण्यासाठी विरोध केला जातो हे बरोबर नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे सरकार नाही. मराठी माणसाचं काहीही होवो, सरकारला फरक पडत नाही. सरकारचा वचक नाही म्हणून एखादी व्यक्ती असा विरोध करीत आहे. मराठी म्हणून नाही तर कोणत्याही समाजाला घर किंवा ऑफिस नाकारणे चुकीचे आहे. अशा प्रकरणात शिवसैनिक पुढे येऊन मदत करतील. बाळासाहेबांचा विचार संपूर्ण हिंदुस्थानने मानला आहे. भाषा, प्रांत पाहून घटना घडू नये. जर मराठी माणसाची कॉलनी असली असती आणि तिथे इतरांना विरोध केला असता तरी आम्ही तिथे विरोध केला असता. शिवसेना फक्त मराठी माणसाला नाही तर गुजराती, मारवाडी सर्वांनाच मदत करते असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. आजच पंकजा मुंडे यांना घर नाकारल्याचं कळलं असं देखील दानवे यांनी सांगितलं.