औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या डीपीडीसीच्या निधी वाटपाच्या मुद्द्यावरून राडा झाला. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. डीपीडीसीच्या बैठकीत अंबादास दानवे आक्रमक झाले, त्यांनी मंचावर उठून संताप व्यक्त केला. विरोधी आमदारांना निधी देत नसल्यामुळे अंबादास दानवे आक्रमक झाले होते. त्यांच्यातील हा व्हिडिओ समोर आला आहे. गैरसमज झाल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केला तर ग्रामीण भागाच्या लोकांच्या मागणीसाठी आपण भांडत आहोत. आमदारांच्या शिफारसी डावलत असाल तर आवाज उठवणार असे मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केले.
न्यायासाठी भांडणार :डीपीडीसी बैठकीत कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांच्या शिफारशींना केराची टोपली दाखवण्यात आली. मात्र काही जणांच्या कामांना परवानगी देण्यात आली. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. मात्र त्यावर पालकमंत्री संदीपान भुमरे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केराची टोपली दाखवली. त्यावरून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. निधी वळवताना त्यालादेखील काही नियम आहेत. मात्र सर्रास तो वळवला जात आहे. आमदारांच्या कामांना पाहिले प्राधान्य दिले पाहिजे. आम्ही आमच्या मुद्द्यांवर ठाम आहोत. मी केलेली मागणी एकट्याची नसून सर्वच आमदारांची आहे. निधीचे समान वाटप झाले पाहिजे. संदीपान भुमरे ओळखीचे होते म्हणून ठीक अन्यथा काय झाले असते सांगता येत नाही. अशी टीका विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.