औरंगाबाद - भाजप सरकारच्या नियोजनशून्य आणि मनमानी कारभारामुळे देशाचा आर्थिक डोलारा डळमळला असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कंपन्या डबघाईला निघाल्या आहेत. लोकांना घर, गाड्या विकत घेणं अवघड झाले आहे. ३० मोठ्या शहरात तब्बल १३ लाख घरं खरेदीविना अशीच पडून असल्याचे पवार म्हणाले.
भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे देशाचा आर्थिक डोलारा डळमळला - अजित पवार - राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा
भाजप सरकारच्या नियोजनशून्य आणि मनमानी कारभारामुळे देशाचा आर्थिक डोलारा डळमळला असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रा आज पैठण येथे आली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'मतपरिवर्तनातून समाजपरिवर्तन' हा संदेश संत एकनाथ महाराजांनी दिला. जनतेच्या मतपरिवर्तनासाठी, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, आत्महत्या केलेल्या १५ हजार शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी, कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवण्यासाठी ही 'शिवस्वराज्य यात्रा' काढत असल्याचेही पवार म्हणाले.
जिथं लोक भुकेनं व्याकुळ, प्यायला पाणी नाही ! पुराच्या पाण्यात अनेकांनी आपली माणसं गमावली; तिथं या सरकारचे मंत्री सेल्फी काढतात! राज्यावर, तिथल्या जनतेवर ओढवलेल्या संकटाचं यांना जराही गांभीर्य नसल्याचे म्हणत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.