छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अनेक भागात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू असताना, 'शेतकरी आत्महत्या आजच्या नाहीत, अनेक वर्षांपासून त्या होत आहेत', असं वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. याबाबत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती तयार केली असून; ते अभ्यास करतील, इतकंच नाही तर आत्महत्या थांबवण्यासाठी योग्य उपाय योजना करतील आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल असेही सत्तार यांनी सांगितलं.
सत्तार यांच्या मतदार संघात आत्महत्या : राज्यात कधी अवकाळी पाऊस, तर कधी दुष्काळ, यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या हा राज्यासमोर भीषण प्रश्न म्हणून उभा राहिला आहे. त्यातच राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. रविवारी सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथे शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सुरज उदयसिंग शेवगण असे शेतकऱ्याचे नाव असून; त्याची पळसखेडा शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. सतत येणाऱ्या अडचणींमुळे पिके धोक्यात आली. त्यात कर्ज फेडणे अवघड झाले असल्याने, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. नातेवाईकांनी त्यांना सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.