औरंगाबाद- अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून लहान-मोठ्या व्यापाऱ्यांना दरवर्षी आपल्याकडील वजन काटे व वजन मापन साहित्यांचे निरीक्षण करून घ्यावे लागते. त्यानंतर नियमाप्रमाणे फी भरून ते प्रमाणित करून घ्यावे लागते. पण, अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून नेमून दिलेले एजंट नियमापेक्षा जास्त पैसे घेऊन लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची लूट करत असल्याचे औरंगाबादच्या पैठण येथे उघडकीस आले आहे.
पैठण येथील ग्रनी चौकात असलेल्या सानिया किराणा जनरल स्टोअरमध्ये दोन एजंट आले. त्यानंतर त्यांनी आम्ही अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून आलो आहोत, असे म्हणत वजन मापाचे निरीक्षण सुरू केले. त्यानंतर त्यांच्याकडून 1 हजार 450 रुपये घेत त्यांना बनाबट पावती दिली. पण, नियमाप्रमाणे 450 रुपये होतात हे त्या दुकानदाराला माहीत होते. त्यामुळे त्याने पावती मागत मोबाईलवर व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आणि जाब विचारला. त्यानंतर त्या एजंटला व्हिडिओ करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने बनावट पावती घेऊन पैसे परत देत तेथून पळ काढला.