वैजापूर (औरंगाबाद) :प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच गंगापूर चौफुली येथे उघडकिस आली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर, पतीला उपचारासाठी औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याणी सोमेश गायकवाड (वय २१. रा. वाकला) असे मृत महिलेचे नाव आहे.
प्रेमविवाहानंतर फाशी -
या घटनेबाबत अधिक माहिती अशी, की वैजापूर तालुक्यातील वाकला येथील रविंद्र आखाडे यांची मुलगी कल्याणी ही ११ जानेवारी रोजी घरातून निघून गेली होती. त्यानंतर शिऊर पोलीस ठाण्यात रविंद्र यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. या दरम्यान, कल्याणी हिने सोमेश गायकवाड याच्याशी प्रेमविवाह केला. नंतर कल्याणी व सोमेश या दोघांनीही गंगापूर चौफुली येथे एका झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोर तुटल्याने सोमेश बचावला. मात्र, कल्याणीचा मृत्यु झाला.