औरंगाबाद - देशातील शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलनात उतरले आहेत. मात्र ज्या राजकीय पक्षाने आंदोलन केले पाहिजे, त्या काँग्रेस, भाकप माकप या डाव्या पक्षांना लकवा मारला आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. जनहिताच्या दृष्टीने प्रमुख विरोधी पक्ष काहीच करत नसल्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलना पाठिंबा देत राज्यातही नवीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राज्यभरातील मुस्लीम समाजाला सोबत घेऊन हे आंदोलन करणार असल्याचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
देशातील प्रमुख विरोधी पक्षांना लकवा मारलाय - प्रकाश आंबेडकर मुस्लीम समाज शेतकऱ्यांसोबत-
केंद्र सरकाराने नव्याने मंजुर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणातील शेतकरी दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून प्रकाश आंबेडकर यांनी विरोधकांवर टीका केली. केंद्रातील विरोधी पक्षाने या कायद्याविरोधात आंदोलन करायला हवे, रस्त्यावर उतरायला हवे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे विरोधकांना लकवा मारला आहे, अशी खरमरीत टीका आंबेडकर यांनी केली. तसेच जालियनवाला बाग येथे झालेल्या आंदोलनात शिख समाजाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे दिल्लीतील शीख समाजाच्या शेतकऱ्यांच्या जथ्याला, मुस्लीम समाज देखील त्यांच्या सोबत आहेत, हे दाखवून द्यायचं आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुक्यांमध्ये 27 तारखेला मुस्लीम समाजाच्या वतीने वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएम संघटना असेल तर सहभागी होईल-
राज्यातील सर्व मुस्लीम समाजाला घेऊन शेतकऱ्यांच्या समर्थन देण्यासाठी आंदोलन करण्याच्या निर्णयावर पत्रकारांनी यावेळी एम.आय.एम या आंदोलनात सहभागी असेल का? असा प्रश्न केला. त्यावर एमआयएम जर संघटना असेल तर ती या आंदोलनात सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करत एमआयएमला टोलाही लगावला आहे.