औरंगाबाद- मद्यपींनी गटारी अमावस्येचा मुहूर्त साधत बुधवारी मद्यप्राशनाचा आस्वाद घेतला. मात्र, व्यसन वाईट आहे, हे सांगण्यासाठी औरंगाबादच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने गटारी पहाटचे आयोजन केले. या कार्यक्रमात व्यसनाबाबत विडंबन गीत सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
व्यसनमुक्तीसाठी गटारी पहाटचे आयोजन सिडको भागात राहणाऱ्या संजय झट्ट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संजय यांचे चहाचे छोटे हॉटेल आहे. मात्र, व्यसनमुक्तीचा वसा घेतलेल्या संजय यांनी स्वखर्चाने गटारी पहाटचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. 'दारूऐवजी दूध प्या', असा संदेश देण्यासाठी संजय यांनी मोफत मसाला दूध वाटप केले.
गुरुवारच्या सकाळी सिडकोच्या एपीआय कॉर्नर भागात या अनोख्या उपक्रमाने औरंगाबादकरांची सकाळ झाली. यावेळी संजय झट्ट या सामाजिक कार्यकर्त्याने व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी विडंबन गीत सादर केले. विविध गाजलेल्या चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर स्वतः रचलेल्या गीतांचा आधार घेऊन त्यांनी विविध गाणी सादर केली. त्यांनी सकाळी ७ ते १२ यावेळेत नागरिकांना मोफत दूध वाटप करून दारूऐवजी आरोग्यास उपयुक्त दुधजन्य पदार्थांचे सेवन करा, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
या उपक्रमाचे हे पहिले वर्ष असून दरवर्षी असे उपक्रम राबवणार असल्याचे संजय झट्टे यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद देत उपक्रमाच कौतुक केले.