औरंगाबाद- मुकुंदवाडी येथील संघर्ष नगर भागात मंगळवारी मध्यरात्री व्यसनाधीन अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने अग्नितांडव घडवून आणले. त्यांनी परास परिसरात एका घरासह ५ वाहनांना आग लावली. या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
व्यसनाधीन टोळक्याचे कृत्य, एका घरासह ५ वाहने जाळली - Aurangabad
मुकुंदवाडी येथील संघर्ष नगर भागात मंगळवारी मध्यरात्री व्यसनाधीन अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने अग्नितांडव घडवून आणले. त्यांनी परास परिसरात एका घरासह ५ वाहनांना आग लावली.
या जळीतकांडामध्ये सुभाष कुलकर्णी, आर. आर. चौधरी, नंदू चोरगे, रमेश रंगवते, रामदास लोखंडे या पाच जणांची वाहने जाळण्यात आली आहेत. तर रमेश रंगवते यांचे संपूर्ण घर आगीमध्ये जळून खाक झाले आहे. रंगवते हे सुतार काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, टवाळखोरांच्या मस्तीने त्यांच्या आयुष्यभराची कमाई क्षणात डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे. पोलीस निरीक्षक यु. जी. जाधव यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. आरोपी अल्पवयीन असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांचा माग काढत आहोत, असे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी रमेश रंगवते यांचे घर जाळण्यात आले, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरच संघर्ष नगर पोलीस चौकी आहे. मात्र, पोलीस चौकीत पोलीस कर्मचारीच हजर नसल्याने अनेक महिन्यांपासून चौकी ओसाड पडली आहे. या चौकीत पोलीस हजर असते. तर, अशा घटना घडल्या नसत्या. त्यामुळे पोलीस चौकी तातडीने सुरू करावी, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.