औरंगाबादमध्ये साठेबाजांवर कारवाई; 5 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त
साठेबाजांवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील करंजखेड येथे कारवाई करून टोळीला अटक केली. या कारवाईत नऊ हजार किलो तांदूळ आणि ११५ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.
औरंगाबाद- एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. असे असताना देखील मोठ्या प्रमाणात साठेबाजीचे प्रमाण वाढत आहे. या साठेबाजांवर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील करंजखेड येथे कारवाई करून टोळीला अटक केली. या कारवाईत नऊ हजार किलो तांदूळ आणि ११५ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. असा एकूण पाच लाख ६१ हजार पाचशे रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सुभाष तेजराव गवारे (३२), कलीम खाँ अय्युबखाँ पठाण (३६), कडूबा माणिकराव वाघ (५५), विस्मिल्ला गुलाम शेख (२७) सर्व रा. करंजखेडा ता. कन्नड अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
खबऱ्याकडून मिळाली माहिती...
पोलिस ठाणे पिशोर हद्दीतील करंजखेड्यात काही व्यक्ती अवैधरीत्या गॅस व रेशनच्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची खाबऱ्याच्या माहितीवरून छापा टाकण्यात आला. एका दुकानात घरगुती आणि व्यावसायिक वापराचे दोन लाख ८७ हजारांचे एकूण ११५ गॅस सिलिंडर सापडले. त्यापैकी ६२ सिलिंडर भरलेले होते. तर, कलीम खाँ अय्युब खाँ पठाण याच्याकडे दोन लाख ७४ हजार ५०० रुपये किंमतीचे स्वस्त धान्य दुकानात विक्री होणारा नऊ हजार १५० किलो तांदूळ सापडला.
चढ्या भावाने विक्रीचा उद्देश
साठवलेला माल बेकायदेशीररीत्या काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ व स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ च्या कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप सोळंके, राजेंद्र जोशी, शेख नदीम, संजय भोसले, गणेश गांगवे, रामेश्वर धापसे आदींनी केली आहे.