औरंगाबाद- भरधाव जाणाऱ्या बोअरवेलच्या गाडीने दुचाकीवरील ३ तरुण आणि एक पादचारी वृद्धाला चिरडले. या अपघातात चौघेही जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला-लोणी रस्त्यावर घडली. एकाच परिसरातील चारजण ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अक्षय प्रकाश पवार, जगदिश विलास पवार, अविनाश देविदास पवार (सर्व वय -२२ वर्ष, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे दुचाकीवरील तिन्ही मृत तरुणाची नावे आहेत. तर छगन रुस्तुम पवार (वय-७० वर्ष) असे मृत पादचारी वृद्धाचे नाव आहे.
मृत अक्षय, जगदिश आणि अविनाश हे तिन्ही तरुण त्यांच्या( एम. एच. २० डी. एक्स ७८७०) या दुचाकीने वैजापूर तालुक्यातील वाकोला गावात लग्नासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यावर ते गावी परत जात असताना शिऊर बांगला-लोणी रस्त्यावर समोरून भरधाव वेगात आलेल्या (के. ए. ५१ ए ४९१८) या बोअरवेलच्या गाडीने समोरून दुचाकीला धडक देत चिरडले. त्यानंतर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पायी जाणाऱ्या छगन पवार यांनादेखील गाडीने चिरडले.
या भीषण अपघात चौघेही जागीच ठार झाले. बोअरवेल गाडी चालक गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिसांनी घटनासाठी धाव घेत मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविले आहेत.