औरंगाबाद - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांनी अर्ज मागे घेतला असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून अब्दुल सत्तारांची माघार, काँग्रेसचा प्रचार न करण्याची घेतली भूमिका - काँग्रेस
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून अब्दुल सत्तारांनी माघार घेतली आहे. तसेच या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय १५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद लोकसभेची उमेदवारी काँग्रेसने न दिल्याने सत्तारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देत त्यांनी आमखास मैदान येथे जाहीर सभा घेत आपली भूमिका जाहीर केली. या सभेत काँग्रेसचे नाराज खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी देखील सत्तारांना पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाने उमेदवारी बदलून सत्तारांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. काँग्रेस पक्ष बंडाची दखल घेऊन उमेदवारी देईल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, पक्षाने सुभाष झांबड यांना ब फॉर्म देत त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्यास मतांचे विभाजन होईल, त्यामुळे मी उमेवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी काँग्रेसचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. तसेच या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबतचा निर्णय १५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेऊ, असे त्यांनी सांगितले.