गंगापूर (औरंगाबाद) -तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला होता. त्यातच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातचे पीक देखील वाया गेली होती. मात्र, नुकसान भरपाईच्या मदतीपासून तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे वंचित राहिला आहे. पीकविमा वाटपात महाविकास आघाडीने पक्षपात केला आहे. असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
आमदार प्रशांत बंब यांचा आरोप शेतकऱ्यांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल -
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी होऊनही पीक विमा कंपन्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे. शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवल्यात येत आहेत. गंगापूर मतदारसंघात पीकविमा देण्यात आला नाही मात्र शिवसेनेच्या मतदारसंघात पीकविमा वाटप केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पीक विमा नाही दिला तर उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार बंब यांनी दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली -
प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेंतर्गत सन २०२० च्या खरिप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापसासह, तूर, कांदा, उडीद, मुगाचा पीकविमा भरला होता. गेल्या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच जोर कायम ठेवल्याने मूग शेतातच खराब झाला. कापसाच्या वाती झाल्या, कांद्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली होती. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीकविमा भरला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी पीकविम्याची रक्कम मिळने अपेक्षित असताना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आहे.
केवळ गंगापूर तालुक्यावर अन्याय? -
विमा मंजूर करताना पीक कापणी प्रयोग, उंबरठा उत्पन्न, तसेच अतिवृष्टीच्या नोंदीचा अभ्यास करून पीक विमा मंजूर केला जातो. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या नियमांचा विचार झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. कोरोना सारख्या महामारीत शेतीमालाला भाव नसुन शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे त्यातच पीक विमा मंजूर करताना जिल्ह्यातील सर्वच तालुक्यासाठी पीकविमा मंजूर झाला असून केवळ गंगापूर तालुक्यावर अन्याय झाल्याची शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे.
हेही वाचा - ..नाही तर आढळरावांनी तोंडाला काळे फासून खेड तालुक्यात यावं - आमदार दिलीप मोहिते