महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीसीटीव्ही : चोरट्याने एकाच घरात कपडे बदलून दोनदा केली चोरी - CCTV

एका चोरट्याने तीन तासात दोन वेळा एकाच घरात चोरी केल्याची घटना औरंगाबादच्या देवळाई परिसरात घडली आहे. चोरट्याने दोन्ही वेळा वेगवेगळे पडे परिधान केले होते. त्याने रोकड, सोन्याच्या अंगठ्या, मिक्सर, टीव्ही, लॅपटॉप लांबवली आहे.

c
c

By

Published : Sep 12, 2021, 8:27 PM IST

औरंगाबाद -पत्नीच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचे घर फोडून चोराने तीन तासात घरगुती साहित्यासह सोन्याच्या अंगठ्या आणि रोकड लांबवली. ही घटना शनिवारी (11 सप्टेंबर) भरदिवसा देवळाई परिसरातील क्रितीका रेसीडेन्सीत घडली. विशेष म्हणजे या चोराने दोन चकरा मारत कपडे बदलून येत साहित्य लंपास केले. हा चोरटा रेसीडेन्सीतील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यावरुन चिकलठाणा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चोरट्याने एकाच घरात कपडे बदलून दोनदा केली चोरी

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागात शालीकराम मैनाजी चौधरी (वय 29 वर्षे, रा. क्रितीका रेसीडेन्सी, देवळाई परिसर) हे लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीला प्रसव कळा सुरू झाल्यामुळे 9 सप्टेंबरला हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 11 सप्टेंबरला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून चौधरी हे रुग्णालयात गेले होते. तेथून सायंकाळी पाचच्या सुमारास ते घरी पोहोचले. तोपर्यंत त्यांच्या घरी चोरी झाली होती. घरी पोहोचलेल्या चौधरी यांना स्वयंपाक खोलीतील बेसीनमध्ये तुटलेले कुलूप आढळले. तसेच कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. शोकेस फोडून चोराने त्यातील सात व पाच ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, 80 हजारांची रोकड लांबविल्याचे दिसले. त्यानंतर स्वयंपाक खोलीतील मिक्सर, बैठक खोलीतील टीव्ही, लॅपटॉप व बॅग, असे साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर चौधरी यांनी चिकलठाणा पोलिसांशी संपर्क साधला.

श्वान काही अंतरावर जाऊस घुटमळला

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांनी पथकासह घटनस्थळाची पाहणी केली. श्वान पथकालाही यावेळी पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोराने दुचाकीचा वापर केल्यामुळे श्वान काही अंतरावरपर्यंत जाऊन घुटमळला. पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यात एक चोरटा दुचाकीवरुन आल्याचे उघड झाले. याप्रकरणी चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिकलठाणा पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 12 सप्टेंबर) सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

कपडे बदलत केली चोरी

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी चोराने दोनवेळा चकरा मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पहिल्या चकरेत त्याने शर्ट-पॅन्ट घातली होती. तर दुसऱ्यावेळी निळा टी-शर्ट घातल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. दरम्यान, चोराच्या दुचाकीचा क्रमांक सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून आलेला नाही. तर भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

हेही वाचा -औरंगाबादच्या ग्रामीण भागात पाचवी ते सातवी वर्गांचा होणार श्री गणेशा

ABOUT THE AUTHOR

...view details