महाराष्ट्र

maharashtra

कौतुकास्पद..! औरंगाबादच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह झेपावला अवकाशात

By

Published : Feb 11, 2021, 10:45 AM IST

औरंगाबादमधील मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला.

satellite launching
उपग्रह प्रक्षेपण

औरंगाबाद -महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला कमी वजनाचा उपग्रह अवकाशात झेपावला आहे. हा सोहळा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अनुभवला. स्वत:च्या हाताने तयार केलेला उपग्रह यशस्वीपणे अवकाशात गेल्यानंतर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील घरी दिवाळी साजरी करत दिवस अविस्मरणीय केला.

उपग्रह तयार करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

रामेश्वरम येथून झाले उपग्रहाचे प्रक्षेपण -

भारतरत्न 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन स्पेस रिसर्च चॅलेंज 2021' अंतर्गत एकाच वेळी शंभर उपग्रह सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांनी त्या कार्यशाळेत एक उपग्रह तयार केला. फाऊंडेशनने जगात सर्वात कमी 25 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 80 ग्रॅम वजनाचे असे शंभर उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर सायंटिफिक बलून द्वारे प्रस्थापित करण्याचा उपक्रम राबवला. हे उपग्रह आकाशात सोडल्यानंतर प्रत्यक्ष वातावरणाची माहिती पाठवणार आहेत. देशातील शंभर विद्यार्थी यात सहभागी झाले होते. हे उपग्रह रामेश्वरम येथून बलूनद्वारे आकाशात सोडण्यात आले.

प्रक्षेपणाचा झाला विक्रम -

एकाच वेळी शंभर उपग्रह अवकाशात झेपावण्याची ही पहिलीच वेळ होती. या उपक्रमाने अनेक विक्रम नोंदवले आहेत. उपग्रह सोडण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, भारतीय बुक रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण औरंगाबादमधील विद्यार्थ्यांनी पाहिले. आपणच तयार केलेला उपग्रह अवकाशात झेपावताना पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या कामात मिळालेला अनुभव सर्वोत्तम असून भविष्यात शास्त्रज्ञ व्हायचे स्वप्न असल्याचे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग -

महानगरपालिकेच्या तीन शाळांमधील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. सोनाली यादव, सुरज जाधव, विशाल वाहुळ, गुलनाज सय्यद, राणी चोपडे, नंदिता मोटे, प्रतिमा म्हस्के, साहिल केदारे, इरशाद खान आणि रुपाली गायकवाड या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होते. तसेच पुणे येथे प्रशिक्षण केंद्रात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. अब्दुल कलाम नॅशनल फाउंडेशन स्पेस रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक मिलिंद चौधरी आणि मनीषा चौधरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळेत करण्यात आले होते. यामध्ये प्रकल्प समन्वयक शशिकांत उबाळे, संस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, रश्मी होंमुटे, सुरेखा महाजन यांनी सहभाग घेतला.

कोविडमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रक्षेपणात सहभागी होता आले नाही -

जानेवारी 2021मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी पुणे येथे जाऊन कार्यशाळेत कमी वजनाचा उपग्रह तयार केला होता. हा उपग्रह ७ फेब्रुवारीला रामेश्वरम येथून सोडण्यात आला. सोहळा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना जाता आले नाही. कोविडमुळे या विद्यार्थ्यांना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळाली नसल्याची माहिती सांस्कृतिक आधिकारी संजीव सोनार यांनी दिली. मात्र, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आली होती. सहभागी 10 विद्यार्थ्यांसोबत शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याची माहिती संजीव सोनार यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या घरी झाली दिवाळी साजरी -

उपग्रहाचे प्रक्षेपण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या घरी अक्षरश: दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या पालकांना अभूतपूर्व आनंद झाला होता. उपक्रमात सहभागी सोनाली यादव आणि सुरज जाधव यांच्या आई-वडिलांनी परिसरात पेढे वाटले. आमच्या मुलांनी तयार केलेला उपग्रह अवकाशात झेपावला आहे, असे सर्वांना त्यांनी सांगत आपला आनंद व्यक्त केला. तर उपक्रमात सहभागी गुलनाज सय्यदच्या आई-वडिलांनी नातेवाईकांना घरी बोलवत दावत दिली. गुलनाज केलेल्या या कामगिरीबद्दल तिच्या नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले. हा दिवस आयुष्यातील सर्वोत्तम दिवस असून भविष्यात या उपक्रमामुळे आम्हाला फायदा होणार आहे. या उपक्रमातून भविष्यात शास्त्रज्ञ होण्याची इच्छा निर्माण झाल्याचे मत उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details