औरंगाबाद -बैल पोळा सणाच्या निमित्ताने बैल धुण्यासाठी शिवना नदीपात्रामध्ये गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील देवळी येथे घडली. या घटनेने देवळी गावावर शोककळा पसरली आहे. भास्कर आण्णासाहेब ठोंबरे, असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा -दोन बायका करणारी व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात कशी - चंद्रकांत पाटील
..अशी घडली घटना
सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान भास्कर ठोंबरे हे पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी शिवना नदीपात्रात गेले असता, बैल जोराचा हिसका देवून खोलगट भागात गेला, त्याचबरोबर बैलाला बांधलेला कासरा खेचला गेला व या वाहत्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने भास्कर ठोंबरे काही अंतरापर्यंत वाहत गेले. नाकातोंडात पाणी गेल्याने काही क्षणातच ते पाण्यात बुडाले, सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडाओरड केली, परंतु वेळेवर कोणतीही मदत न मिळाल्याने भास्कर ठोंबरे हे दिसेनासे झाले. दरम्यान या घटनेची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. त्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर. भालेराव हे पोलीस कर्मचारीसह घटनास्थळी हजर झाले. जवळपास दोन तास शोध घेण्यात आला, परंतु ठोंबरे यांचा मृतदेह हाती लागला नाही. याच दरम्यान कन्नडहून अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. ते येताच त्यांच्या पाच ते सहा जवानांनी तात्काळ पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. पाण्यात गळ्यात फसलेल्या भास्कर ठोंबरे यांचा मृतदेह मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढताच नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. ऐन सणासुदीच्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी घटनेने देवळी गावात शोककळा पसरली.
मागील वर्षी देखील घडली होती दुर्घटना
गेल्या वर्षी देखील लाखणी तालुका वैजापूर येथील चौदा वर्षीय मुलगा श्रीमंत रामजी कदम हा पाण्यात बुडाल्याची घटना ताजी असताना देवळी येथील शेतकरी बुडाल्याने शिवनाकाठच्या शेतकऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठोंबरे यांचा मृतदेह देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टी.आर. भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
हेही वाचा -कोरोना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, माझ्याशी नाही - चंद्रकांत पाटील