कन्नड (औरंगाबाद)- कन्नड ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणारे 95 वर्षीय व्यक्तीने कोरोनावर मात केल्याने त्यांचा व कोविड सेंटरमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी सत्कार केला.
बोलताना कोरोनामुक्त आजोबा तालुक्यातील करंजखेड येथील 95 वर्षीय एका पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे वय जास्त असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे, असा विचार सुरू होता. मात्र, त्यांच्या नातीने कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयावर विश्वास दाखवत, येथेच उपचार करावा, असे सांगितले. उपचाराअंती ते कोरोनामुक्त झाले झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.
रुग्णालयातून घरी जाताना 95 वर्षीय त्या व्यक्तीने रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच रुग्णालयातील आपला अनुभव सर्वांना सांगितला. यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे यांनी कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. प्रवीण पवार, डॉ. मनीषा गीते तसेच कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी डॉ. प्रवीण पवार म्हणाले की, कन्नड तालुक्यातील रुग्णांनी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी. रुग्ण पहिल्या, दुसऱ्या दिवशी घाबरलेले असतात ते दोन दिवस त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. रुग्णांच्या नातेवाईकांचेही मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर रुग्णांच्या आवडी-निवडीनुसार आहार देखील दिला जातो. रुग्णांच्या आजारानुसार तात्काळ इलाज सुरू करून उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णांचा सकारत्मक प्रतिसाद मिळतो. वरिष्ठ अधिकारी प्रशासकीय तालुका अधिकारी यांच्याकडून देखील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून पदाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे कर्मचारी वर्गही तितक्याच जबाबदारीने कोविड रुग्णांना सेवा देत असल्याने सर्वच रुग्ण ठणठणीत होत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष स्वाती कोल्हे म्हणाल्या, कन्नड ग्रामीण रुग्णालयातील या कोविड सेंटरमधील सर्वच रुग्ण उपचारांती बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. सर्व कर्मचारी आणि अधिकारी एक दिलाने रुग्ण सेवा देत असल्याने येथील मृत्य दर शून्य टक्के आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संतोष कोल्हे, डॉ.प्रवीण पवार, डॉ.मनीषा गीते, नगरसवेक अनिल गायकवाड यासह आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा -जुन्या वादातून पतीने न्यायालयाच्या आवारातच पत्नीला भोसकले